
विद्यार्थ्यांसह पालकांनाही मिळाला दिलासा; पावसापासून बचावासाठी मोठा आधार
अहेरी : अहेरीचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकाराने आष्टी येथील सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुलांना मोठा दिलासा मिळाल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोककल्याण फाऊंडेशन आष्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल डांगे यांच्या प्रयत्नांतून हा कार्यक्रम यशस्वी झाला.
राहुल डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला ममता डांगे, राखी मडावी, सरोजा बोंडे, शाळेच्या मुख्याध्यापिका एस. डी. गलबले आणि शिक्षक एम. यु. खोब्रागडे, चंद्रवैभव आत्राम, नितीन सेडमाके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर गावातील काही समाजबांधव आणि पालकांनाही छत्र्यांचे वाटप करण्यात आले. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या या समाजसेवेबद्दल राहुल डांगे यांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक आय. एम. शेरेकर यांनी केले, तर आभार शिक्षक पी. टी. वाकडे यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक बी. ए. क्षीरसागर, टी. एम. मल्लेलवार, के. आर. मसराम यांनीही सहकार्य केले.



