‘हेलिकॉप्टर घ्या, पण गाव-तालुक्यात या… साहेब!’ – काँग्रेसचे अनोखे आंदोलन उद्या

पालकमंत्र्यांची अनुपस्थिती आणि वाढत्या जनसमस्यांविरोधात जिल्हा काँग्रेस आक्रमक ; प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांना करणार हेलिकॉप्टरचे वाटप
गडचिरोली : जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, शेतकऱ्यांचे प्रश्न, रानटी हत्तींचा उपद्रव, अपूर्ण सरकारी कामे, बेरोजगारी, अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधा, आणि प्रशासनाची उदासीनता यांसारख्या दैनंदिन समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी “हेलिकॉप्टर घ्या; पण गाव-तालुक्यात या साहेब!” या घोषणेने २६ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे आंदोलन करणार आहे. नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी पालकमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावपातळीवर यावे, अशी काँग्रेसची मागणी आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मागील तीन वर्षांपासून जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी स्वतःकडे घेतली असली तरी, प्रत्यक्षात जनतेच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत.
गडचिरोली-आल्लापल्ली-सिरोंचा मार्गासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. १०० किमी अंतर पार करण्यासाठी १०-१२ तास लागत असून, खड्ड्यांमुळे अपघात, वाहतूक विस्कळीत आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बस सेवा देखील कमी करण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न: वादळ वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही अजूनपर्यंत आर्थिक मदत मिळालेली नाही. रानटी हत्तींचा उपद्रव वाढला असूनही त्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही. सुरजागड खदानीतील अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात आणि रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था यामुळे मान्सूनपूर्वच जिल्ह्यातील रस्ते बंद करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली आहे, यामुळे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाने मोठा गाजावाजा करून शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत केले, मात्र त्याच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चांगल्या आणि सुरक्षित बसेस नाहीत. अनेक बसेसची दयनीय अवस्था झाली आहे. शेतकरी आणि नागरिक छोट्या-मोठ्या समस्या घेऊन प्रशासकीय कार्यालयात गेल्यास त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. अधिकाऱ्यांकडून ‘साहेब व्ही.सी.मध्ये किंवा बैठकीत व्यस्त आहेत’ असे सांगून त्यांना परत पाठवले जाते. फक्त वातानुकूलित खोलीत बसून जिल्ह्यातील नागरिकांना अडचणीत आणणारे आदेश प्रशासनाकडून काढले जातात. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या समस्या कोणीही ऐकून घेत नाही. अनेक कंत्राटदारांची शासकीय कामांची देयके थकीत आहेत. नवीन कामाचे नियोजन झाले नाही. पावसाळा सुरू झाला असूनही बऱ्याच घरकुल धारकांना रेती मिळाली नाही, त्यांची देयके थकीत आहेत. मनरेगाचे पैसे अजून प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही. जिल्ह्यातील बेरोजगार तरुण अजूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांकरिता शेतकऱ्यांशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता सरसकट जमिनी अधिग्रहीत करण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष नाही. या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसने हे आंदोलन पुकारले आहे.
ब्राम्हणवाडे यांनी म्हटले आहे की, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रत्यक्ष येऊन जनतेची दुःख समजून घ्यावीत, अशी अपेक्षा जनतेची आहे. पण प्रत्यक्षात, “कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टर चालते, पण जनतेच्या दुःखासाठी वेळ नाही?” अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री केवळ शासकीय कार्यक्रमांसाठी हेलिकॉप्टरने गडचिरोलीत येतात आणि लगेचच नागपूरला परत जातात. इतकेच नाही तर जिल्ह्यातील प्रमुख पदांवर बसलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील हीच परिस्थिती आहे; सर्वसामान्य जनतेला भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही.
यामुळे, पालकमंत्र्यांसह प्रमुख पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी गाव किंवा किमान तालुकास्तरावर तरी यावे, या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या गंभीर असून, प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष गाव-तालुक्यांमध्ये जाऊन समस्या ऐकाव्यात, अशी ठाम मागणी काँग्रेसने आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. रस्त्यांची दुरवस्था, अपूर्ण सरकारी कामे, वीज आणि वाहतूक समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, या सर्व बाबींवर तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा रोष आणि आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.



