
प्रशासन आता थेट जनतेच्या दारी ; टोकन पद्धती आणि चोख नियोजनामुळे नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्याचे निर्देश
तुमसर : “प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा, या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ‘जनता दरबाराचे’ आयोजन करण्यात येत आहे. प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन त्या कालबद्ध मर्यादेत निकाली काढण्यासाठी सर्व यंत्रणांनी गांभीर्याने काम करावे,” असे स्पष्ट निर्देश भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
तुमसर येथील तहसील कार्यालय परिसरात आयोजित जिल्हास्तरीय ‘पालकमंत्री जनता दरबारात’ ते बोलत होते. या दरबारात जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी तब्बल २५४ निवेदने सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर आमदार राजू कारेमोरे, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव आणि भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार कारेमोरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, लोकशाही पद्धतीने सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास यामुळे मोठी मदत होत असल्याचे सांगितले.
जनता दरबाराचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. प्रत्येक नागरिकाला टोकन क्रमांक देण्यात आला होता. टोकन पुकारल्यानंतर नागरिक थेट पालकमंत्र्यांकडे आपली समस्या मांडत होते. यावेळी डॉ. भोयर यांनी प्रत्येक निवेदनाची संवेदनशीलतेने दखल घेतली आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जागेवरच विचारणा करून आवश्यक ते निर्देश दिले. यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश होता: पाणीपुरवठा व रस्ते: गावागावांतील पिण्याच्या पाण्याची समस्या आणि अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती. कृषी व पट्टेवाटप: शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि प्रलंबित भू-पट्टे वाटपाचे विषय. विकास निधी: विविध गावांत विकासकामे करण्यासाठी निधीची मागणी. परिवहन: एसटी बस थांबा आणि बस फेऱ्या वाढवण्याबाबतची निवेदने.
पालकमंत्री डॉ. भोयर यांनी माहिती दिली की, आतापर्यंत तालुका स्तरावर झालेल्या २३ जनता दरबारांमध्ये अंदाजे १,००० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्या निकाली काढण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. “हा उपक्रम केवळ एक दिवसाचा नसून, दर सोमवारी तालुका स्तरावर तक्रारींचे निराकरण केले जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगराध्यक्ष सागर गभने, पंचायत समिती सभापती दीपिका गोपाले, उपसभापती सुभाष बोरकर, माजी खासदार मधुकर कुकडे, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी उपेश अंबादे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपेश अंबादे यांनी केले, तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांनी व आभार मनोहर चव्हाण यांनी मानले. प्रशासनाच्या या थेट जनसंवादामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रलंबित प्रश्न सुटण्याची आशा पल्लवित झाली आहे.



