
डासांचे जीवनचक्र आणि प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन, जनजागृती मोहिमेवर भर
गोंदिया : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून महिन्यात १ ते ३० जून या कालावधीत हिवताप प्रतिरोध महिना साजरा केला जातो. या महिन्यादरम्यान, हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया आणि मेंदूज्वर यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी जनजागृती मोहीम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जातात. याच अनुषंगाने, हिवताप व इतर कीटकजन्य आजारांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात येत असून, विविध अद्ययावत प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित केले जात असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी दिली.
२६ जून रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तिरोडा येथे पावसाळापूर्व कीटकजन्य आजार नियंत्रण, जलजन्य आजार व उपाययोजनांसंबंधी एक विशेष प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण आणि तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दर्शना नंदागवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी तिरोडा तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथील आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेवक उपस्थित होते.
हिवताप कार्यशाळेत हिवताप विभागाचे कीटकशास्त्रज्ञ अनिल चोरवाडे, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक किशोर भालेराव, आणि एम्बेडेड अशासकीय संस्थेचे जिल्हास्तरीय समन्वयक कांचन बिसेन यांनी मार्गदर्शन केले.
हिवताप कार्यशाळेत जिल्हा हिवताप कार्यालयाचे कीटकशास्त्रज्ञ अनिल चोरवाडे यांनी हिवताप आजाराबाबत्त डासांचे जीवनचक्र, पाण्यात डासांची होणारी वाढ, डासामध्ये प्लासमोडीयम जंतूची वाढ आणि हिवताप जंतू भारीत परिपक्व प्रौढ डास मानवाला चावल्यानंतर मानवाच्या रक्तात व अवयवात आढळणारे बदल याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, हिवताप नियंत्रणासाठी लार्वा व प्रौढ डास यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.
जिल्हास्तरीय पर्यवेक्षक किशोर भालेराव यांनी हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. यात गप्पी मासे, अँबेट सोडणे, संडास-बाथरूमच्या पाईपला व्हेंट जाळी बसवणे, मच्छरदाणीचा वापर, गुणवत्तापूर्ण फवारणी, नियमित गृहभेटीदरम्यान करावयाची कामे, विविध विभागांची हिवताप कमी करण्याची जबाबदारी, कीटकजन्य आजारासंबंधी माहिती आणि शासनाने ठरवून दिलेल्या निकषांचा अवलंब करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
फॅमिली हेल्थ इंडिया एम्बेड प्रोजेक्टचे गोंदिया जिल्हास्तरीय समन्वयक कांचन बिसेन यांनी जिल्ह्यात त्यांच्या स्वयंसेवकांच्या मार्फत होत असलेले सर्वेक्षण व जनजागृतीवर माहिती दिली. हिवताप कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी तिरोडा तालुका आरोग्य सहाय्यक लिलाधर निपाणे यांनी विशेष प्रयत्न केले.



