गडचिरोलीविदर्भ

पोलिसांची समयसूचकता ; सती नदीत वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे वाचले प्राण

गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील सती नदीवरील पुलाजवळ तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी समयसूचकता दाखवत नदीच्या प्रवाहासोबत वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीचे प्राण वाचवले. अजय बाळकृष्ण रामटेके (वय ४०, रा. श्रीराम नगर, कुरखेडा) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांची जलपातळी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याच्या दुर्घटना घडत असतात. याच पार्श्वभूमीवर, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांनी सर्व पोलीस स्टेशन/उप-पोलीस स्टेशन/पोलीस मदत केंद्रांना अशा दुर्घटनांबाबत उपाययोजना करून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे सती नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच, नदीवरील मुख्य पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पुलाशेजारी तात्पुरत्या स्वरूपात पूल बांधण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने २९ जून २०२५ पासून सती नदीवरील पुलाच्या ठिकाणी पोलीस स्टेशन कुरखेडा येथील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

३० जून रोजी अजय रामटेके हे त्यांच्या दुचाकी वाहनाने सती नदीवरील तात्पुरत्या पुलावरून प्रवास करत असताना, नदीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते आपल्या दुचाकीसह नदीच्या प्रवाहासोबत वाहून जात होते. याच वेळी सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्तात तैनात असलेले पोउपनि. दयानंद भोंबे, सफौ. शालिक मेश्राम आणि पोहवा. शाम शेणकपट यांनी समयसूचकता दाखवत तत्परतेने दोरीच्या सहाय्याने सदर व्यक्तीस पाण्याच्या प्रवाहातून सुखरूपपणे बाहेर काढून तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे दाखल केले.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली गोकुळ राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कुरखेडाचे पोनि. महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात पोउपनि. दयानंद भोंबे, सफौ. शालिक मेश्राम व पोहवा. शाम शेणकपट यांनी केली.

यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अशा पूर परिस्थितीवेळी सतर्कतेने सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button