
‘राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाची ७५ वर्षे‘ या विषयावर मार्गदर्शन; वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता
गडचिरोली : विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी, त्यांचा जन्मदिवस ‘२९ जून’ हा दरवर्षी “राष्ट्रीय सांख्यिकी दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाने २००७ पासून हा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गडचिरोली येथे २९ जून रोजी ज्ञानेश्वर बा. खडतकर, उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली “राष्ट्रीय सांख्यिकी दिवस” साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात अध्यक्षांनी ज्येष्ठ सांख्यिकी शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या सांख्यिकी शास्त्रातील अनमोल योगदानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावर्षी शासनाने ठरवून दिलेल्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाची ७५ वर्षे या विषयावर आणि प्राध्यापक महालनोबिस यांच्या योगदानाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी उपयोजित अर्थशास्त्र विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील सहायक प्राध्यापक डॉ. धैर्यशील खामकर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गडचिरोली, जिल्हा नियोजन समिती, तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील जिल्ह्यातील विविध विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील वनकावार, सहायक संशोधन अधिकारी यांनी केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन रमेश गं. निखारे, अन्वेषक यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानून केले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर करण्यात आले.



