गडचिरोलीविदर्भ

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

वादळी वाऱ्यामुळे तुटलेली तार ठरली मृत्यूला कारणीभूत ; विद्युत विभागाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह, ग्रामस्थांमध्ये संताप

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे विजेच्या तारेचा स्पर्श होऊन गिरीधर मारोती कुथे (वय ४७) या शेतकऱ्याचा बुधवार, २ जुलै रोजी दुपारच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात काम करत असताना वादळी वाऱ्यांमुळे जमिनीवर पडलेली विद्युत तार न दिसल्याने हा अपघात घडला, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गिरीधर कुथे हे आपल्या शेतात, सावंगी नाल्याजवळ बेलण मारण्याचे काम करत होते. दरम्यान, परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि पावसामुळे विद्युत खांबावरील तार तुटून शेतात पडली. ही तार लक्षात न आल्याने तिचा स्पर्श कुथे यांना झाला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने देसाईगंज पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल भागात विद्युत पुरवठ्याची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याआधीही तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या व उघड्या तारांमुळे अनेक दुर्घटना घडल्या असून, विद्युत विभागाचे दुर्लक्ष कायम चर्चेचा विषय ठरले आहे. आमगाव येथील या घटनेमुळे विद्युत वितरण कंपनीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button