गडचिरोलीविदर्भ

अल्पवयीन मुलांना दुचाकी देणाऱ्या २४ पालकांवर गुन्हे दाखल; वाहतूक शिस्त लावण्यासाठी पोलिसांची कारवाई

गडचिरोली : गडचिरोली शहरातील वाढत्या वाहतुकीच्या वर्दळीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, शहरात अनेक अल्पवयीन मुले विनापरवाना दुचाकी चालवताना आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहरातील वाहतूक शिस्तबद्ध पद्धतीने होऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बेजबाबदार वाहनचालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने, अल्पवयीन मुलांना दुचाकी वापरण्यासाठी देणाऱ्या २४ पालकांवर पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये २९ जून रोजी १४ पालकांवर, तर ३ जुलै रोजी १० पालकांवर कारवाई करण्यात आली.

२९ जून आणि ३ जुलै रोजी गडचिरोली पोलिसांनी शहरातील पाच विविध ठिकाणी नाकाबंदी मोहीम राबवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली. या तपासणीदरम्यान, अनेक अल्पवयीन मुले वाहन चालवताना मिळून आली. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहन परवाना नसतानाही त्यांच्या पालकांनी त्यांना दुचाकी वापरण्यासाठी दिल्यामुळे, मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ कलम १९९ (ए) अन्वये या २४ पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत त्यांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ कलम १९९ (ए) नुसार, जर अल्पवयीन व्यक्तीने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या पालकांना जबाबदार धरले जाते. या कलमांतर्गत, अल्पवयीन बालकाकडून मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा घडल्यास, अशा वाहनाच्या मालकास ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा २५,००० रुपये दंड किंवा दोन्हीही अशा कडक शिक्षेची तरतूद आहे. तसेच, अशा अल्पवयीन बालकावर बाल न्याय अधिनियम २०१५ नुसार बाल न्याय मंडळासमोर खटला देखील चालविला जाऊ शकतो.

या मोहिमेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, “सदर मोहिमेचा उद्देश शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे हा असून, पालकांनी देखील जबाबदारीने वागून आपल्या मुलांना रस्ते वाहतुकीविषयीच्या सर्व नियमांची माहिती करून द्यावी.” तसेच, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी यापुढे ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

सदरची मोहीम पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली गोकुळ राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण, वाहतूक शाखेचे सपोनि. शरद मेश्राम आणि पोस्टे गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button