
गडचिरोली : महाराष्ट्रातील विविध सरकारी विभागांमधील कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था आणि विकासक यांनी राज्य सरकारकडे थकीत असलेली सुमारे ८९ हजार कोटी रुपयांची देयके तात्काळ अदा करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा गडचिरोली जिल्हा तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी पंडा यांना निवेदन सादर करण्यात आले. या गंभीर आर्थिक अडचणीमुळे राज्यातील विकासकामे थांबण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या आठ-दहा महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास, जलसंधारण व जलसंपदा विभाग, जलजीवन मिशन यांसारख्या अनेक विभागांची विकासकामे करणाऱ्या या घटकांना त्यांची देयके मिळालेली नाहीत. यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या करोडो कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
या गंभीर प्रश्नावर संबंधित घटकांनी गेल्या वर्षभरापासून सातत्याने लोकशाही मार्गाने आंदोलने, आमरण उपोषणे, मोर्चे आणि मंत्री व अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवेदने दिली आहेत. मात्र, तरीही शासन आणि प्रशासनाकडून याकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर संबंधित मंत्र्यांकडे वेळोवेळी निवेदने देऊनही चर्चा करण्यासाठी बैठकीची वेळ दिली जात नसल्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेतीनंतरचा हा राज्यातील सर्वात मोठा व्यवसाय आहे आणि यावर अवलंबून असलेले लाखो लोक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जर ही देयके तातडीने अदा केली नाहीत, तर राज्याची सर्व जनताभिमुख विकासाची, सुधारणांची आणि योजनांची सुरळीत चालणारी कामे या ‘चक्रव्यूहात’ अडकून बसतील, अशी तीव्र भीती व्यक्त करण्यात आली आहे.
प्रलंबित देयके (विभागनिहाय): सार्वजनिक बांधकाम विभाग: ४० हजार कोटी रुपये, जलजीवन मिशन अंतर्गत कामे: १२ हजार कोटी रुपये, ग्रामविकास विभाग: ६ हजार कोटी रुपये, जलसंधारण व जलसंपदा विभाग: १३ हजार कोटी रुपये, नगरविकास अंतर्गत विशेष ४२१७ निधी, DPDC फंड, २५१५ ग्रामीण सुधारणा विभाग कामे: १८ हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत.
या सर्वंकष माहितीच्या आधारे शासनाने, राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने तात्काळ मार्ग काढून सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा कंत्राटदार आणि विकासक संघटनांनी व्यक्त केली आहे.
निवेदन देताना कंत्राटदार अजय तुम्मावार, अमोल आईंचवार (प्रदेश संघटक, कंत्राटदार महासंघ), रणछोड कलंत्री, सागर निंबोरकर, राहुल नीलमवार, प्रसाद कवसे, शुभंकार चक्रवर्ती आणि इतर उपस्थित होते.



