गोंदियाविदर्भ

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती ; अनेक मार्ग बंद, शाळांना सुट्टी जाहीर

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गोंदिया : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, जिल्ह्यात आज ११०.६ मिमी इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे गेट दुपारी १ ते २ वाजता उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे बाघ नदीच्या काठावरील गावातील नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याशिवाय, मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील संजय सरोवर धरणाचे दोन गेट ३ फूट उंचीपर्यंत उघडण्यात आले आहेत. यामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून, वैनगंगा नदीकाठच्या गावातील नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद करण्यात आली आहे. केशोरी हद्दीतील: वडेगाव ते खोलदा, दिनकरनगर ते करांडली, प्रतापगड ते कडोली, प्रतापगड ते रामनगर, इलदा ते वडेगाव. नवेगावबांध हद्दीतील: रामपुरी गावादरम्यान असलेल्या पुलावर पाणी आल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. देवरी हद्दीतील: चिचेवाडा ते मुर्दोली, डवकी ते शिलापूर, गोटाबोडी ते बोरगाव, शेडेपार रस्ता. चीचगड हद्दीतील: निलज, घोंनाडी, सिंगांडोह-रोपा नाला, ककोडी/चिलाटी नाला, परसोडी जवळ (चीचगड–देवरी रोड). अर्जुनी मोरगाव हद्दीतील: बोरी ते मांडोखाल, कोरंबी टोला ते मांडोखाल, सिलेझरी ते येरंडी (विहीरगाव), महागाव, शिरोली, ईटखेडा, बोंडगाव/देवी ते खांबी आणि चान्ना ते बोंडगाव/देवी मार्ग काही वेळात बंद होण्याची शक्यता. आमगाव हद्दीतील: किंडगीपार ते जवरी, किंडगीपार ते शिवनी, जामखारी ते धावडीटोला, कालीमाटी ते सुपलीपार, सुपलीपार पाटीलटोला ते मोहगाव रस्ते बंद झाले आहेत.

जिल्हा प्रशासनाने सर्व आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीचेच पालन करावे, तसेच पूरग्रस्त मार्गांवरील प्रवास टाळावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button