गडचिरोलीविदर्भ

‘शक्तिपथ’ कार्यशाळेतून मलेरियामुक्तीचा संकल्प ; महिलांना मच्छरदाणी वापराचे प्रात्यक्षिक

पोलोच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने जनजागृती ; आरोग्यविषयक माहितीसोबत ‘धोक्याचा मलेरिया गं ताई’ गीत सादर

गडचिरोली : एटापल्ली तालुका मुख्यालयापासून ५९ किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि अतिदुर्गम भागात वसलेल्या कोहका गावात मुक्तिपथ संस्थेने महिलांसाठी ‘शक्तिपथ’ संघटनेची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश गावाला मलेरियामुक्त करणे हा होता. यावेळी महिलांना मलेरिया नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यासोबतच, मच्छरदाणी कशी बांधावी याचे प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले.

कोहका गावात दर रविवारी ‘पोलो’मुळे संपूर्ण गावाला सुट्टी असते. या दिवशी सकाळी ‘माता पूजन’ केले जाते आणि महिला शेतीच्या कामाला जात नाहीत, अशी येथील पूर्वापार परंपरा आहे. याच ‘पोलो’च्या दिवशी ‘मुक्तिपथ’ने ‘शक्तिपथ’ स्त्री संघटना कार्यशाळेचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने स्वागत आणि हळदीकुंकूने झाली. त्यानंतर ‘धोक्याचा मलेरिया गं ताई’ हे जनजागृतीपर गीत सादर करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला एक सकारात्मक सुरुवात मिळाली.

या कार्यशाळेत तालुका संघटक किशोर मल्लेवार यांनी मलेरिया कसा पसरतो, तो टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, घराला फवारणी कशी करावी, घरातील पाणी झाकून कसे ठेवावे आणि मच्छर चावू नये यासाठी योग्य पद्धतीने मच्छरदाणी कशी बांधावी याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्वतः याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि त्यानंतर गावातील महिलांनीही उत्साहाने हे प्रात्यक्षिक केले.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी आशा कार्यकर्ती लता हिचामी, छाया दुर्वा, रंजू दुर्वा, गाव पाटील राणू हिचामी आणि दिवाकर हिचामी यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button