
तातडीच्या मदतीसाठी शासनाकडे पाठपुराव्याचे आश्वासन
गडचिरोली: गोसीखुर्द धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे वैनगंगा नदीसह इतर नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना आणि शेतीला मोठा फटका बसला आहे. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी काही पूरग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला, तसेच प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
पूरग्रस्त भागाची पाहणी करताना डॉ. नेते यांनी ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधला. त्यांनी शेती पिकांचे नुकसान, घरांची पडझड, जनावरांचे हाल आणि अन्नधान्याचे नुकसान याबाबत माहिती घेतली. या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनदरबारी मांडून तातडीची मदत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
डॉ. नेते यांनी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना त्वरित सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. जनावरे, धान्य व शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, अनावश्यक हालचाली आणि नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सावली येथे आले असता, डॉ. नेते यांना कवठी पारडी व हरणघाट रस्त्यांची दयनीय अवस्था, धानपिकाचे नुकसान, गावांतील पायाभूत सुविधांचा अभाव आणि संपर्क यंत्रणांची अडचण यावर स्थानिक पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी गंभीर मुद्दे उपस्थित केले. यावर समन्वयातून उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली.
पूरपरिस्थितीची पाहणी करताना त्यांच्यासोबत मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, अरुण हरडे, अविनाश पाल, डॉ. भारत खटी, किशोर वाकुडकर, पं.स. माजी सभापती छाया शेंडे, राकेश गोलेपल्लीवार, सुरज किनेकर, दीपक शेंडे, जितेश सोनटक्के, विनोद धोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



