गडचिरोलीविदर्भ

इरकडुम्मे गावात मलेरिया आजाराबाबत जागृती

महिला संघटनेचा पुढाकार ; मच्छरदाणीचा नियमित वापर करण्याचे आवाहन

गडचिरोली: भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या इरकडुम्मे गावात ‘मुक्तिपथ’ आणि गाव संघटनेच्या वतीने ‘शक्तिपथ महिला संघटनेची’ महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मलेरिया या गंभीर आजाराबाबत सखोल जनजागृती करण्यात आली, तसेच मलेरियापासून बचावासाठी विविध उपाययोजना आणि नियमित कृती करण्याचे आवाहन ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना करण्यात आले. ‘धोक्याचा मलेरिया गं ताई’ या गाण्याने बैठकीची सुरुवात करण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण झाले.

यावेळी मुक्तिपथच्या तालुका संघटिका नीळा किन्नाके यांनी पोस्टरच्या माध्यमातून ग्रामस्थांना मलेरिया आजाराविषयी माहिती दिली. यंदा जून महिन्यातच पावसाची सुरुवात झाल्याने जागोजागी पाणी साचले आहे, ज्यामुळे डासांची पैदास अधिक होत आहे. या पार्श्वभूमीवर मलेरिया आजारापासून दूर राहण्यासाठी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

थंडी वाजून ताप येणे. तापाबरोबर खूप डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, थकवा जाणवणे. कधीकधी फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे. अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयात तपासणीसाठी जाण्याचे आवाहन नीळा किंनाके यांनी केले.

मलेरियापासून दूर राहण्यासाठी नियमितपणे मच्छरदाणीचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गावातील लोकांना मच्छरदाणीचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले. घरामध्ये ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाकडून औषधांची फवारणी करून घेतली पाहिजे. तसेच, शेतात काम करताना किंवा बाहेर वावरताना शक्यतो अंग झाकेल असे कपडे घालण्याचा सल्लाही यावेळी महिलांना देण्यात आला.

या माहितीचा प्रचार आपल्या घरी, शेजारी आणि मोहल्ल्यात करण्याची जबाबदारी महिलांना देण्यात आली. तसेच, गावात खड्डे आणि पाणी साचलेल्या ठिकाणी श्रमदान करून खड्डे बुजवण्याचे ठरविण्यात आले. आपला गाव पूर्णपणे मलेरियामुक्त झाला पाहिजे आणि मलेरिया आजारामुळे कुणीही दगावू नये, असा सामूहिक संकल्प यावेळी घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button