
साकोली येथील लाखांदूर रोडवरील घटना
साकोली: मजुरीच्या कामावरून घरी परत येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास लाखांदूर रोड, साकोली येथे घडली. पंकज रामू राऊत (३५, रा. तलाव वॉर्ड, साकोली) असे मृत मजुराचे नाव असून, अविनाश भीमराज शहारे (३१, रा. तलाव वॉर्ड, साकोली) असे जखमीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दररोजप्रमाणे पंकज आणि अविनाश हे लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथे मजुरीच्या कामासाठी गेले होते. सायंकाळी त्यांनी पिंपळगाव येथून साकोलीपर्यंत ऑटोने प्रवास केला. नजीकच्या बोधरा फाटा येथे उतरून ते दोघे पायी साकोलीकडे जात होते. याचवेळी, मागून वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पंकज राऊत याचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश शहारे गंभीर जखमी झाला. दोघांनाही तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, साकोली येथे नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पंकजला तपासून मृत घोषित केले.
कुटुंबावर शोककळा
पंकज राऊत याचा मागील वर्षीच विवाह झाला होता. सुखी संसाराची स्वप्ने पाहत असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात येत आहे.



