गडचिरोलीविदर्भ

देसाईगंजच्या उर्दू शाळेत ‘गजब’ प्रकार; शिक्षिकेचा पतीच व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष, पटसंख्या १६ वर

या गंभीर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी – समाजवादी पक्षाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

देसाईगंज: देसाईगंज नगर परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळा, जवाहर वॉर्ड येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील एका शिक्षिकेचा पतीच शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असून, शाळेची पटसंख्या अवघी १६ विद्यार्थ्यांपर्यंत घसरली आहे. समाजवादी पक्षाने या प्रकाराची गंभीर दखल घेत कमी पटसंख्येसाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका आणि संबंधित शिक्षिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

समाजवादी पक्षाने या प्रकरणासंदर्भात मुख्याधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्याकडे निवेदन दिले आहे. निवेदनात कमी पटसंख्येला जबाबदार असलेल्या शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेची योग्य चौकशी करण्यात यावी. सदर उर्दू शाळेला उर्दू माध्यमासोबतच इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्याची मागणी. शाळेत नर्सरी वर्ग सुरू करण्याची मागणी. या मागण्यांचा समावेश आहे.

समाजवादी पक्षाने निवेदनात म्हटले आहे की, मागील अनेक दिवसांपासून सदर शाळेत मुलांची पटसंख्या कमी आहे. शाळेत दोन शिक्षिका कार्यरत असूनही, विद्यार्थी वाढवण्याकडे त्यांचे कोणतेही लक्ष नाही. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावर येथीलच एका शिक्षिकेचा पती नियुक्त आहे, तर सदस्य पदावर देसाईगंज येथील एक संस्थाचालक आहे. समाजवादी पक्षाने या गंभीर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे, अन्यथा समाजवादी पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नगर परिषदेत निवेदन देताना समाजवादी पक्षाचे तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष शरीफ शेख, सचिव तहेसीन पठाण, जावेद खान, समाजवादी पार्टी नेते महेबूब खान, तसेच जिल्हा महासचिव जिब्राईल शेख आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button