गडचिरोलीविदर्भ

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा; अन्यथा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर ‘घंटा नाद आंदोलन’ – महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा इशारा

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यतः कृषिप्रधान असून, सध्याचा खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने मदत करावी, अशी मागणी केली आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर “घंटा नाद आंदोलन” करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ब्राह्मणवाडे यांनी निदर्शनास आणून दिले की, जिल्ह्यातील अनेक भागांत पिके वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी उगवण पातळीवरच बी-बियाणे कुजल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा स्थितीत, शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागांत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. तसेच, दुबार पेरणीसाठी शासकीय स्तरावर उत्तम दर्जाची बियाणे मोफत पुरवावी, अशी मागणी त्यांनी केली.

त्याचबरोबर, जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस बी-बियाण्यांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. अशा बनावट बियाणे विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशीही काँग्रेसची मागणी आहे.

शेतकऱ्यांना खतांच्या टंचाईचाही मोठा फटका बसत असल्याचे ब्राह्मणवाडे यांनी म्हटले. अनेक कृषी केंद्रांवर युरिया आणि डीएपी खतांचा तुटवडा आहे. काही ठिकाणी विक्रेते ‘लिंकिंग’ पद्धतीचा अवलंब करून खतासोबत इतर वस्तू खरेदी करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडत आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार येत असून, ही पद्धत तात्काळ थांबवण्याची आवश्यकता आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे.

या सर्व मागण्यांची तात्काळ पूर्तता न झाल्यास, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर “घंटा नाद आंदोलन” करण्यात येईल, असा इशारा महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button