गडचिरोलीविदर्भ

दारूबंदी झाल्याशिवाय माघार घेणार नाही

पयडी वासियांचा निर्धार ; गावात ‘बाजा बजाव‘ आंदोलन

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील पेंढरी क्षेत्रातील पयडी गाव आज ‘बाजा बजाव’ आंदोलनाने दुमदुमले. गावातील महिला, पुरुष, पदाधिकारी, संघटन सदस्य आणि ‘मुक्तिपथ धानोरा’ चमूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. गावात दारूविक्री पूर्णपणे थांबली पाहिजे आणि चोरून लपूनही कुणी दारू विकू नये, या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले.

पयडी गावातील महिला आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे अवैध दारूविक्री काही प्रमाणात बंद झाली होती. मात्र, काही मुजोर विक्रेते पुन्हा चोरट्या मार्गाने दारू विकू लागल्याची माहिती महिलांना मिळाली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ‘मुक्तीपथ-शक्तिपथ’ संघटनेच्या महिलांनी गावातील विक्रेत्यांना शेवटची ताकीद देण्यासाठी रॅली काढली. “अवैध व्यवसाय बंद करा, अन्यथा पोलीस विभागाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करू,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गाव संघटना, महिला आणि पुरुषांनी गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भात ग्रामसभा घेऊन सर्वानुमते दारूबंदीचा ठरावही पारित केला आहे. तरीही काही विक्रेते लपूनछपून दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्याने, गाव संघटनेने अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी अहिंसक कृतीचे नियोजन करत, गावात दारू आढळल्यास कायदेशीर पद्धतीने माल नष्ट करून नुकसान करण्यात येईल, असेही ठरवले आहे. “जोपर्यंत गावातील दारू पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही महिला माघार घेणार नाही,” असा दृढ निर्धार आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केला.

यावेळी गाव पाटील सोमजी करंगामी, पोलिस पाटील राजश्री परचापी, मदन करंगामी, भूमिया दामा करंगामी, विजय रामटेके, अवसू आतला, आशा वर्कर आम्रपाली रामटेके, मीना करंगामी, श्यामबती कुदराम यांसह ‘मुक्तीपथ-शक्तिपथ’चे पदाधिकारी अध्यक्ष पुष्पा चौधरी, उपाध्यक्षा रामदयी पवार, सचिव निरंजना मांदाळे आणि मोठ्या संख्येने गावातील महिला सदस्य उपस्थित होत्या. ‘मुक्तीपथ’ तालुका संघटक राहुल महाकुलकर, उपसंघटक भास्कर कड्यामी, प्रेरक बुधाताई पोरटे, आणि शितल गुरनुले यांनी यावेळी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button