
आरमोरी-देसाईगंज मार्गावरील घटना; चार महिन्यांपूर्वीच वडिलांनी केली होती आत्महत्या
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील प्रशांत राजू बोरूले (वय २९, रा. कोंढाळा) या तरुणाचा गुरुवारी (दि. १७) दुपारी आरमोरी-देसाईगंज मार्गावर ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बिघडलेल्या ट्रकला टोईंग करून आणत असताना हा अपघात झाला. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वीच प्रशांतच्या वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याने घरात तो एकटाच कमावता होता. या घटनेमुळे बोरूले कुटुंबावर दुहेरी संकटाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोंढाळा गावापासून २ किलोमीटर अंतरावर आरमोरी मार्गावरील धोडीनालाजवळ एक ट्रक बिघडल्याने बंद पडला होता. या ट्रकला कोंढाळ्याला आणण्यासाठी प्रशांत बोरूले हा विना-ट्रॉली ट्रॅक्टर घेऊन गेला होता. त्याने ट्रकला मोठा दोरखंड (टोचन) बांधून कोंढाळा गावाकडे आणण्यास सुरुवात केली.
धोडीनालावरील मुख्य मार्गावर खोलगट भाग असल्याने ट्रॅक्टरचा वेग वाढला. प्रशांतने वेग कमी करण्याचा प्रयत्न केला असता, ट्रकला बांधलेल्या दोरखंडाला ढील पडली आणि तो ट्रॅक्टरच्या चाकात गुंडाळला गेला. यामुळे ट्रॅक्टरचे संतुलन बिघडले आणि तो रस्त्याच्या कडेला उलटला. दुर्दैवाने, प्रशांत त्या ट्रॅक्टरखाली दबला गेला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील किरण कुंभलवार यांनी तत्काळ देसाईगंज पोलीस ठाण्यास माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅक्टर सरळ करत प्रशांतचा मृतदेह बाहेर काढला आणि देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. देसाईगंज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मृत प्रशांतच्या वडिलांनी चार महिन्यांपूर्वीच विष प्राशन करून आत्महत्या केल्याने, घरात तोच एकमेव कमावता आधार होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, चार वर्षांची मुलगी आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बोरूले कुटुंबावर मोठा आघात झाला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



