आरोग्यगोंदियाविदर्भ

हिवताप नियंत्रणासाठी ‘टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि ट्रेसिंग कॉन्टॅक्ट’ ‘3T’चा मंत्र उपयुक्त – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोल्हार

गोंदिया जिल्हास्तरीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याला हिवतापमुक्त करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी ‘3T’ (टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि ट्रेसिंग कॉन्टॅक्ट) चा मंत्र उपयुक्त असल्याचे सांगितले. बुधवारी जिल्हा परिषदेतील स्व. वसंतराव नाईक सभागृहात संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या आढावा सभेत ते बोलत होते.

या आढावा सभेप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या प्रमुख उपस्थितीत किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमासंबंधी होत असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, हिवताप विभागाचे नंदकिशोर भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. हिवताप विभागाच्या विविध कार्यक्रमांचे आढावा सादरीकरण डॉ. विनोद चव्हाण यांनी केले.

डॉ. गोल्हार यांनी नमूद केले की, गोंदिया जिल्हा हिवतापाबाबत संवेदनशील जिल्हा म्हणून घोषित असून, तो भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. भातशेतीसाठी आवश्यक चिखलाचे पाणी आणि तलावांचा जिल्हा म्हणून असलेली ओळख, तसेच जंगलव्याप्त भाग, घनदाट झाडी व झुडपे यामुळे डास व डासअळीसाठी पोषक वातावरण असते. जिल्ह्यात मजुरांचे स्थलांतरण होत असल्याने बाराही महिने हिवतापाचे रुग्ण आढळतात.

हिवतापाचा प्रसार रोखण्यासाठी केवळ मच्छरांनाच नव्हे, तर डासअळीलाही नष्ट करणे गरजेचे आहे. यासाठी लोकसहभाग आणि इतर विभाग तसेच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकांनी गावपातळीवर लोकांना आरोग्य शिक्षण देऊन त्यांच्या सवयी बदलण्याबाबत सामाजिक वर्तणूक बदलण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

‘3T’ (टेस्टिंग, ट्रीटमेंट व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) म्हणजेच, आरोग्य कर्मचाऱ्यांनी गृहभेटीतून तापसदृश रुग्णांची तपासणी करणे, प्रकारानुसार तत्पर उपचार करणे आणि सभोवतालच्या लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व नियमित फॉलोअप करण्याचा फॉर्म्युला अवलंबिण्याचा मंत्र डॉ. गोल्हार यांनी दिला. लोकसहभागातून हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

डॉ. अभिजीत गोल्हार यांनी पावसाळ्यात जलजन्य व किटकजन्य आजार (उदा. हिवताप, मेंदुज्वर, चिकुनगुनिया, हत्तीपाय व डेंग्यू) यांची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमित गृहभेटी सर्वेक्षण, तालुकास्तरीय हिवताप कार्यशाळेतून आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका यांना प्रशिक्षित करणे, डासांची पैदास रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतीचे उपाययोजना, गावात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येत असलेले प्रतिबंधात्मक उपाययोजना, हिवतापाबाबतचे प्रभावी पर्यवेक्षण, हिवताप रोखण्यासाठी जैविक बाबींचा वापर, प्रौढ डास कमी करण्याचे विविध पद्धती, हिवताप बाधित रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठीच्या उपाययोजना, मलेरियाच्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी विविध विभागांमार्फत करण्यात येणार्या उपाययोजना, डासअळी नाशक पद्धती, आश्रम शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांची रक्त तपासणी, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने संडास-बाथरूमच्या पाईपला व्हेंट जाळी बसविणे, पत्तासिजन व स्थलांतरित लोकांची आरडीके किटने मलेरियाबाबत तपासणी करणे, फवारणी कार्यक्रम, कीटकजन्य आजारावर शासनाने ठरवून दिलेल्या निकषांचा अवलंब करून प्रतिबंधात्मक उपाययोजना, किटकजन्य आजाराबाबत जनजागृती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे, शाळा व महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण अशा विविध बाबींवर चर्चा करुन सुचना दिल्या.

या आढावा बैठकीमध्ये किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी, प्रगती आणि अडचणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती देण्यात आली, तसेच कार्यक्रमांमध्ये अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यामध्ये सुधारणा करण्याचे व लाभार्थ्यांपर्यंत सेवा प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देश दिले. ही बैठक आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button