गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

पालकमंत्री वाढदिवसाला काय देणार ‘रिटर्न गिफ्ट’? ; काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडून विकासाची अपेक्षा

गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्याला विकासाचे काय ‘रिटर्न गिफ्ट’ देणार? हा प्रश्न काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस २२ जुलै रोजी गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री फडणवीस गडचिरोलीत आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा आणि सत्कार नको, तर जिल्ह्याच्या प्रलंबित विकासकामांना गती मिळावी, अशी अपेक्षा ब्राह्मणवाडे यांनी सोमवार, २१ जुलै रोजी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

यावेळी आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोटकर, रमेश चौधरी, मिलिंद खोब्रागडे, वामन सावसागडे, घनश्याम वाढई, वसंता राऊत, रजनीकांत मोटघरे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष ब्राम्हणवाडे म्हणाले, खऱ्या अर्थाने दिवंगत आर. आर. पाटील (आबा) यांनी जिल्ह्याला विकासाची दिशा दिली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक दौरे करून जनतेच्या समस्यांचे निराकरण केले. स्थानिक आदिवासी, ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय सुरू केले. महिला रुग्णालय मंजुर करून ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभे रहावे यासाठी इमारतींचे बांधकाम केले. दळणवळणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दोन राज्यांना जोडणारा कालेश्वर ब्रिज तयार केला. स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्या याकरिता स्थानिक पातळीवर पोलिस भरती प्रक्रिया राबवून रोजगार उपलब्ध करून देण्यात आले.

मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस यांच्या तीन वर्षांतील कार्यकाळात जिल्ह्यात 2 हजाराहुन अधिक विविध पदे रिक्त आहेत. अर्ध्या शेतकऱ्यांना बोनसचे पैसे मिळाले नाही. रानटी डुकर व हत्तींकडून शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यावर अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही, अशा अनेक समस्या जिल्ह्यात आवासून उभ्या असतानासुद्धा जिल्ह्याचे पालकत्व स्विकारूनही त्याकडे दुर्लक्ष करीत उद्योगपती मित्रांचा भला करण्यासाठीच जिल्हा दौऱ्यावर येत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केला.

ब्राह्मणवाडे यांनी स्पष्ट केले की, कोणताही लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो आणि त्याच्यासाठी सर्वात मोठे ‘गिफ्ट’ हे जनतेच्या समस्यांचे निराकरण आणि जिल्ह्याचा विकास असतो. केवळ शुभेच्छा स्वीकारून थांबण्याऐवजी, पालकमंत्र्यांनी या दिवसाचे औचित्य साधून गडचिरोलीच्या विकासासाठी भरीव पाऊले उचलावीत, अशी जनतेची भावना आहे.

जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या या मागणीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्र्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते किंवा जिल्ह्यासाठी कोणत्या घोषणा होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ही मागणी म्हणजे जिल्ह्याच्या विकासाच्या अपेक्षांना वाचा फोडण्याचा एक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

विकासाच्या थापा मारणारे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस मंगळवार, 22 जुलैला जनतेला चॉकलेट व लालीपॉपचे वाटप करून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात साजरा करण्यात येणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष ब्राम्हणवाडे यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी मांडलेल्या या भूमिकेनंतर, आता शासन स्तरावरून गडचिरोली जिल्ह्यासाठी काय विशेष पाऊले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण होतात का, हे येणारा काळच सांगेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button