भंडाराविदर्भ

अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजनेत बदल

३.१५ लाख रुपये थेट बँक खात्यात जमा होणार ; स्वयंसहाय्यता बचत गटांनी अर्ज करण्याचे आवाहन

भंडारा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी असलेल्या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवण्याच्या योजनेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वस्तू स्वरूपात अर्थसहाय्य न देता, ३.१५ लाख रुपयांची रक्कम थेट बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यात (VPDA द्वारे) जमा करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय ८ मार्च २०१७ रोजी (क्र. एटीटीएस २०१६/प्र.अ.१२०५/अजाक) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

योजनेच्या अटी व शर्ती

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटांनी अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. बचत गटाचे राष्ट्रीयीकृत बँकेत बचत गटाच्या नावाने बँक खाते असावे आणि सदर बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असावे. स्वयंसहाय्यता बचत गटाने खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही भारत सरकारच्या कृषी मंत्रालय (Ministry of Agriculture & Farmers Welfare, Department of Agriculture, Co-Operation and Farmers Welfare) द्वारे निर्धारित केलेल्या फार्म, मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टींग इन्स्टीट्यूटने (Farm Machinery Training and Testing Institute) तपासणी करून जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार (Specification) असावीत. पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांना शासनाने त्या-त्या जिल्ह्यासाठी निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टांनुसार अर्थसहाय्य मंजूर करून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या बचत गटाला त्यांनी खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर चालवण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अर्थसहाय्य घेतल्यानंतर सदर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने विकता येणार नाहीत किंवा गहाण ठेवता येणार नाहीत. या आशयाचे हमीपत्र स्वयंसहाय्यता बचत गटाला द्यावे लागेल. तसेच, पुढील १० वर्षांपर्यंत याबाबतचे प्रमाणपत्र मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकार्‍याकडे सादर करणे बंधनकारक असेल. ज्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी यापूर्वी पॉवर ट्रिलर किंवा मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला आहे, त्या बचत गटांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद चौक, भंडारा येथे संपर्क साधून अर्ज सादर करण्याचे आवाहन आशा कवाडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button