गडचिरोलीविदर्भ

कोलपल्ली नाल्याच्या पुरातून ग्रामसेवकाची सुटका

जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील ग्रामसेवक उमेश धोडरे (वय ४५) हे बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोलपल्ली नाल्याच्या अचानक आलेल्या पुरात अडकले होते. चारचाकी वाहनासह नाला ओलांडत असताना पाण्याचा प्रचंड लोंढा आल्याने त्यांचे वाहन वाहून गेले. मात्र, प्रसंगावधान राखत धोडरे यांनी एका झाडाला घट्ट पकडून आपले प्राण वाचवले.

घटनेची माहिती मिळताच, महसूल विभाग, पोलीस विभाग आणि स्थानिक बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अतिशय काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबवलेल्या बचाव कार्यामुळे धोडरे यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी त्यांच्या घरी पाठवण्यात आले.

जिल्हा प्रशासनाच्या या वेळेवर आणि तत्पर कारवाईमुळे एक मोठी दुर्घटना टळली. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यांना अचानक पूर येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा परिस्थितीत प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि पुलावरून पाणी वाहत असताना पाण्यातून वाहन चालवण्याचा धोका पत्करू नये. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button