
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेफोड्रोन (एमडी) या घातक अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एक ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आहे. या कारवाईत ६.४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना एमडी ड्रग्ज विक्रीसाठी वाहनातून फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. यावेळी राहुल अनिल पवार (वय २८, रा. एमईएल, चंद्रपूर) आणि ड्रग्ज पुरवणारा चिनू महेश गुप्ता (वय १८, रा. महाकाली कॉलरी, चंद्रपूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून ५ ग्रॅम मेफोड्रोन (एमडी), मोबाईल आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट १९८५ च्या कलम ८ (क), २२ (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करून राहुल पवार आणि चिनू गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश गुप्ता (रा. महाकाली कॉलनी, चंद्रपूर) हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात एपीआय दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर आणि सर्वेश बेलसरे आदींनी यशस्वीपणे पार पाडली.



