गडचिरोलीविदर्भ

घोट तालुका निर्मितीची मागणी ; स्थानिक नागरिकांचे भाजप उपाध्यक्ष डॉ. देवराव होळींना निवेदन

चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील घोट परिसर स्वतंत्र तालुक्याच्या निर्मितीसाठी पुन्हा एकदा आग्रही झाला आहे. घोट परिसरात अंदाजे १७ ग्रामपंचायती असून, जवळपास एक लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. येथील नागरिकांनी आज भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची भेट घेऊन घोट तालुका निर्मितीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली.

घोट परिसरातील नागरिकांना छोटी-मोठी महसुली कामे करण्यासाठी चामोर्शीला जावे लागते, जे अनेकदा सोयीचे नसते. अनेकदा एकाच दिवसात कामे होत नाहीत आणि नागरिकांना रिकाम्या हाती परत यावे लागते, ज्यामुळे त्यांचा हिरमोड होतो. घोट येथे महसूल विभागाच्या सचिवालयाची इमारतही उपलब्ध असल्याने, येथे स्वतंत्र तालुका कार्यालय सुरू करणे अधिक सोयीचे ठरेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

घोट परिसरातील गोरगरीब जनतेची होणारी हेळसांड कमी करण्यासाठी घोट येथे तहसीलदार (तहसील) यांची नेमणूक झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, अशी विनंती जनतेने केली आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली असून, शासनास निवेदनेही सादर केली आहेत, मात्र अद्याप घोट तालुक्याची निर्मिती झालेली नाही. माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या आमदार कार्यकाळातही या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.

निवेदन स्वीकारताना डॉ. देवराव होळी यांनी घोट परिसरातील लोकांच्या दैनंदिन समस्यांकडे जातीने लक्ष घालणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “घोट तालुका निर्मितीसाठी शासनाकडे नियमित पाठपुरावा करून तालुक्याची निर्मिती करण्यासाठी माझा प्रयत्न सुरूच ठेवणार आहे.”

यावेळी अशोक पोरेड्डीवार, आसिफ सय्यद, अविनाश वडेट्टीवार, विलास उइके, अतुल येनगंटीवर, साईनाथ बुरांडे, रुम्पा शाहा, मंगला कुलसंगे, बाबूराव भोवरे, सचिन साखरकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button