महाराष्ट्रमुंबई

कृषिमंत्र्यांचा राजीनामा न घेणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील – विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका

‘कलंकित मंत्र्यांना गोमूत्र शिंपडून पवित्र करा‘; डान्सबार, पैशांच्या बॅगा आणि गडचिरोलीच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करत असताना, विधानमंडळात कामकाजादरम्यान रम्मी खेळत असतानाही सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही, यावरून हे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने ‘गोमूत्र शिंपडून या मंत्र्यांना पवित्र करून घ्यावे,’ असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित करताना वडेट्टीवार यांनी सरकारच्या विविध मंत्र्यांच्या कथित गैरकारभारावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “राज्याचे गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतात, एका मंत्र्यांकडे पैशांच्या बॅगा सापडतात, पण तरीही त्यांची पाठराखण करण्यात येत असेल तर या सर्व मंत्र्यांवर गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे.” त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धक्कादायक प्रकारावरही बोट ठेवले. “लाडकी बहीण म्हणायचे आणि बारमध्ये बहिणींना नाचवायचे असा किळसवाणा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात कधी झाला नव्हता,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. नागपूरमधील बारमध्ये अधिकारी फाईली घेऊन बसतात आणि ते गडचिरोलीचे अधिकारी असल्याची माहिती समोर येते. “गडचिरोलीचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत, असा कारभार सुरू आहे,” असे सांगत वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला.

शेतकऱ्यांच्या आणि कंत्राटदारांच्या गंभीर समस्यांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष वडेट्टीवार यांनी अधोरेखित केले. “एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत, कंत्राटदार आत्महत्या करत आहेत, कारण त्यांची बिले थकली आहेत,” असे ते म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांची बँकांकडे ३५ हजार कोटींची थकबाकी असून, शेतकरी आता नवीन कर्ज घेऊ शकणार नाहीत, त्यामुळे ते अडचणीत आले आहेत; पण सरकारला त्याचे देणेघेणे नाही, अशी टीका त्यांनी केली.

शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी विरोध करत असतानाही, त्या महामार्गासाठी सरकार पैसे द्यायला तयार आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार तयार नाही, यावरही वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महायुती सरकारमधील अंतर्गत संघर्षावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. “महायुती सरकारमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. बाहेरून दाखवायला सगळं सुरळीत आहे, पण आतून प्रचंड असंतोष आहे,” असे ते म्हणाले. या सरकारमधील दोन्ही पक्षांना सत्तेत टिकून राहायचे असल्याने ते ‘तोंड दाबून मुका मार’ सहन करत आहेत, अशी टीका करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सर्व आघाड्यांवरून हल्ला चढवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button