
गडचिरोली : भामरागड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात पोलिस विभागातर्फे जनमैत्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेकडो नागरिकांना मुक्तीपथ तालुका संघटिका नीळा किन्नाके यांनी व्यसनविरोधी व मलेरियाबाबत मार्गदर्शन केले.
हा उपक्रम उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, पोलिस निरीक्षक दीपक डोंब यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. त्यानंतर किन्नाके यांनी मलेरीया आजाराबाबत माहिती दिली. या आजाराची लक्षणे , उपाय समजावून सांगितले. लक्षणे दिसून येताच तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे. हा आजार डासांपासून होत असल्याने नियमित मच्छरदाणीचा वापर करण्याचे आवाहन केले. तसेच गाव विकास करण्यासाठी अवैध दारूविक्री बंद होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामस्थानी एक होऊन कायदेशीररित्या आपल्या गावातून अवैध दारू हद्दपार करावी. घरगुती दारू सुद्धा बंद करावी. त्यानंतर तंबाखूचे दुष्परिणाम समजावून देत आपल्या मुलांना कॅन्सर पासुन वाचवा असेही आवाहन केले. सोबतच गीत, पोवाडा गाऊन दारू, तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध गावातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.



