क्राईमगडचिरोलीविदर्भ

कारमधून अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त, एकावर गुन्हा दाखल 

गडचिरोली : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अनधिकृत बियाणे विक्रेत्यांविरोधात गडचिरोली कृषी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक परिसरात चारचाकी वाहनातून खुल्या स्वरूपात कापूस बियाण्यांची चोरटी विक्री करणाऱ्या रॅकेटचा कृषी विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे बियाणे विक्री करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अडपल्ली चक परिसरात एका टाटा पंच वाहनातून अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री केली जात होती. या माहितीची गंभीर दखल घेत जिल्हा भरारी पथक व आष्टी पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. शनिवारी (१३ जून) केलेल्या या धाडीत ६० किलो अनधिकृत खुले कापूस बियाणे आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची अंदाजित किंमत १ लाख २० हजार रुपये असून, ज्या वाहनातून ही तस्करी सुरू होती, त्या वाहनाची किंमत ६ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

या प्रकरणी गौरव बिटपल्लीवार (रा. मार्कंडा, ता. चामोर्शी) या संशयित आरोपीविरुद्ध जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय ग्यानीराम मेश्राम यांनी आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, बियाणे कायदा १९६६ आणि बियाणे नियम १९६८ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही धडक कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, चामोर्शीचे कृषी अधिकारी चेतन चलकलवार, धानोराचे कृषी अधिकारी पवन मडावी आणि आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या विशेष पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button