
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन ; रेल्वे मैदानावर पाच दिवस रंगणार कृषी व नवतेजस्विनी प्रदर्शनी
भंडारा : जिल्ह्यातील शेतकरी आणि महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी विभाग, ‘आत्मा’ आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने “वैनगंगा कृषीधारा महोत्सव २०२६ तथा नवतेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शनी” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. २० ते २४ मार्च २०२६ या कालावधीत खात रोडवरील रेल्वे मैदान (नूतन महाराष्ट्र शाळेजवळ) येथे हा महोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘आत्मा’च्या संचालक उर्मिला चिखले आणि उपसंचालक अजय राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, २० मार्च रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर भूषविणार आहेत. उद्घाटनाच्या दिवशी ‘माविम’तर्फे आयोजित ‘पुरुष सुधार सन्मान सोहळा’ हे विशेष आकर्षण असणार आहे.
या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रातील AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान आणि ड्रोनचा वापर यावर विशेष भर देण्यात आला आहे. याशिवाय: आधुनिक कृषी यंत्रसामग्री आणि बियाणे-खतांचे स्टॉल्स. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंची विक्री व प्रदर्शन. यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि ‘बी-टू-बी’ (B2B) खरेदीदार-विक्रेता संमेलन. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा.
महोत्सवाचे उद्घाटन 20 मार्च रोजी होणार असून 21 मार्च रोजी अन्नप्रक्रीया परिसंवाद, तसेच शेतकरी-खरेदीदार संवाद (B2B Meeting) यासोबत सास्कंतिक कार्यक्रम. 22 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमीत्त पर्व महिला सक्षमीकरणाचे हा परिसंवाद आणि आहारतज्ञाचे मार्गदर्शन व इतर कार्यक्रम. 23 मार्च रोजी पशुसंवर्धन, दुग्धविकास कुक्कुटपालन, मस्त्यव्यवसाय, तंत्रज्ञान, सुक्ष्म सिंचन, सास्कंतिक कार्यक्रम. 24 मार्च रोजी नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती, प्रगतीशील शेतकरी यांचे अनुभव कथन. उत्कृष्ट शेतकरी पीक स्पर्धा विजेत्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी एकाच छताखाली सर्व योजना
नैसर्गिक शेती, भाजीपाला लागवड, सूक्ष्म सिंचन आणि कृषी पूरक व्यवसायांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन येथे उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि विविध बँकांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहितीही एकाच ठिकाणी मिळेल. जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, भगिनी, ग्राहक आणि नागरिकांनी या माहितीपूर्ण महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.



