
मडावी कुटुंबाला दिला आर्थिक आधार
अहेरी : तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिंतलगुडेम येथील महेश मडावी याचे दीर्घ आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले. या संकटसमयी मडावी कुटुंब पोरके झाले असतानाच, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी संवेदनशीलतेतून या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देऊन मोठा आधार दिला आहे.
महेश मडावी यांच्या निधनाची माहिती मिळताच आमदार आत्राम यांनी तत्काळ मदतीचा निर्णय घेतला. त्यांच्या सूचनेनुसार, माजी प्राचार्य रतन दुर्गे आणि मांतय्या आत्राम यांच्या हस्ते ही आर्थिक मदत मडावी कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली. ऐन दुःखाच्या प्रसंगी मिळालेल्या या आर्थिक पाठबळामुळे शोकसंतप्त मडावी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. मदत सुपूर्द करताना कैलास कोडपे, जिलकारी सिडाम, राजू आत्राम, दशरथ आलाम, राकेश आलाम, योगेश तलांडे तसेच राष्ट्रवादी सोशल मीडिया (अ.प.) चे तिरुपती मडावी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम हे नेहमीच आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जात असतात. मडावी कुटुंबाच्या मदतीसाठी त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि सामाजिक जाणिवेमुळे संपूर्ण अहेरी तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.



