राज्यात ‘अवयवदान’ एक चळवळ म्हणून राबवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘अवयवदान पंधरवडा‘; १५ ऑगस्ट रोजी दात्यांचा सन्मान
गोंदिया : महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढवून गरजू रुग्णांना नवजीवन मिळावे, यासाठी ३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘अवयवदान’ एक चळवळ म्हणून राज्यभर राबवावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत त्यांनी याबाबत सूचना दिल्या.
२९ जुलै रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ‘अवयवदान पंधरवड्या’साठी राज्यस्तरीय नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, केईएम रुग्णालयाचे डॉ. आकाश शुक्ला यांच्यासह वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, अवयवदानाबाबत समाजामध्ये सकारात्मकता आणून त्याविषयीची भीती कमी करणे गरजेचे आहे. यासाठी दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत एक प्रभावी आणि विश्वासार्ह मोहीम राबवावी, जेणेकरून सकारात्मक परिणाम दिसून येतील.
मोहिमेला गती देण्यासाठी आणि अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्यात अवयवदान करणाऱ्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ज्या कुटुंबांनी सामाजिक भान ठेवून मेंदूमृत झालेल्या रुग्णांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला, त्यांचा आणि अवयवदानामुळे नवजीवन मिळालेल्या व्यक्तींचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते केला जाणार आहे.
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी अवयवदानासाठी कार्यरत असलेल्या संस्था, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या आणि आरोग्य विभागाला व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केले. लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करून महाराष्ट्राला अवयवदानात अग्रेसर ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही यावर भर देत सांगितले की, अवयवदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी अधिकाधिक रुग्णांना अवयवदान मिळावे, यासाठी प्रभावी कामकाज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.



