
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्याचे हस्तांतरण कार्यक्रम ; विविध योजनांवर मार्गदर्शन
गडचिरोली : शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता बहुपीक पद्धतीचा अवलंब करावा आणि धान पिकाबरोबरच इतर तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, फळे व भाजीपाला लागवड करून कृषीपूरक व्यवसायातून आर्थिक विकास साधावा व त्यासाठी कृषी विभाग आणि आत्मा (ATMA) यांसारख्या संस्थांचे तांत्रिक मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्याचे हस्तांतरण कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे, उपविभागीय कृषी अधिकारी धर्मेंद्र गिरीपुंजे, कृषी उपसंचालक मधुगंधा जुलमे, विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) नीलिमा पाटील, सुचित लाकडे (उद्यानविद्या), डॉ. विक्रम कदम (पशुसंवर्धन), पुष्पक बोथीकर (पिक संरक्षण), नरेश बुध्देवार (कृषी हवामानशास्त्र), डॉ. प्रीतम चिरडे (कृषिविद्या) तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबद्दल माहिती दिली. या निधीचा उपयोग बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि जनावरांच्या लसीकरणासाठी तसेच इतर किरकोळ शेती खर्चासाठी होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. उपविभागीय कृषी अधिकारी धर्मेंद्र गिरीपुंजे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी (KYC) आणि फार्मर्स आयडी काढून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. कृषी उपसंचालक मधुगंधा जुलमे यांनी शेतकऱ्यांना पिक लागवडीसोबतच कृषी प्रक्रिया उद्योगांकडे वळण्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेबद्दल सखोल मार्गदर्शन केले आणि या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा पाटील यांनी केले, तर आभार सुचित लाकडे यांनी मानले.



