गडचिरोलीविदर्भ

‘डिजिटल जनगणना २०२७’! ४० क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण ; यंदाची गणना होणार पूर्णपणे कागदविरहित

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे अचूक प्रशिक्षणाचे आवाहन ; तालुकास्तरावर प्रगणक आणि पर्यवेक्षकांना मिळणार धडे

गडचिरोली : देशाच्या आगामी ‘जनगणना-२०२७’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला गडचिरोली जिल्ह्यात वेग आला आहे. या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ४० क्षेत्रीय प्रशिक्षकांचे (Field Trainers) तीन दिवसीय सखोल प्रशिक्षण नुकतेच जिल्हा नियोजन सभागृहात यशस्वीरित्या पार पडले. विशेष म्हणजे, यंदाची जनगणना ही इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल आणि कागदविरहित (Paperless) पद्धतीने होणार असून, त्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि जनगणना संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत प्रगणक आणि पर्यवेक्षकांना मोबाइल ॲप आणि डिजिटल पोर्टलचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या ४० क्षेत्रीय प्रशिक्षकांवर असणार आहे.

या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणास मुंबई येथील जनगणना संचालनालयाचे सहाय्यक संचालक जोगेंद्र तामगाडगे आणि नायब तहसीलदार हेमंत मोहरे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तांत्रिक बाबींची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी आशिष वानखेडे व तहसीलदार संतोष आष्टीकर यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधून डिजिटल प्रक्रियेतील विविध तांत्रिक शंकांचे निरसन केले.

प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “जनगणना हा देशाच्या धोरण निश्चितीसाठी सर्वात महत्त्वाचा आधार असतो. यंदाची जनगणना डिजिटल स्वरूपात असल्याने प्रत्येक घटकाची आणि माहितीची अचूक नोंद होणे अनिवार्य आहे. तालुकास्तरावर प्रशिक्षण देताना कोठेही त्रुटी राहणार नाही, याची जबाबदारी क्षेत्रीय प्रशिक्षकांनी चोखपणे पार पाडावी.”

कागदविरहित प्रक्रिया: नोंदणीसाठी छापील अर्जांऐवजी अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर. रिअल-टाइम डेटा: माहिती थेट सर्व्हरवर अपलोड होणार असल्याने प्रक्रियेत वेग येणार. अचूकता: तांत्रिक त्रुटींची शक्यता कमी होऊन डेटा संकलन अधिक विश्वासार्ह होणार. हि डिजिटल जनगणनेची वैशिष्ट्ये आहेत. या प्रशिक्षणासह जिल्ह्यामध्ये आता जनगणना २०२७ च्या प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, लवकरच तालुकास्तरावर प्रगणकांसाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button