
रुग्णांशी संवाद साधून आरोग्य सेवांचा घेतला आढावा ; तातडीने उपचाराचे दिले निर्देश
गडचिरोली : गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि आकांक्षित जिल्ह्यात आरोग्य सुविधा अधिक दर्जेदार व्हाव्यात, या उद्देशाने माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट दिली. रुग्णालयातील सेवांचा थेट आढावा घेण्यासाठी त्यांनी रुग्णांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
डॉ. नेते यांनी थेट रुग्णांच्या खाटेपाशी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. “औषध मिळते का? डॉक्टर तपासायला येतात का? जेवण वेळेवर मिळतंय का? काही त्रास तर नाही ना?” अशा आपुलकीच्या प्रश्नांनी त्यांनी रुग्णांचे मन जिंकले. त्यांच्या या संवादातून रुग्णांना मानसिक दिलासा मिळाला, अशी प्रतिक्रिया अनेक नातेवाईकांनी दिली.
“भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयाच्या स्वच्छतेची, औषधांच्या उपलब्धतेची आणि शौचालयांच्या स्थितीची पाहणी केली. डॉक्टरांशी बोलताना ते म्हणाले की, “हे सरकारी काम नाही, हे लोकांचं आयुष्य आहे. सेवा म्हणजे केवळ कर्तव्य नव्हे, ती आपली जबाबदारी आहे.”
याचवेळी, चामोर्शी तालुक्यातील घारगाव येथील सेवकराम बोरकुटे या रुग्णाची तब्येत खालावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोलंकी यांना फोन करून माहिती दिली. डॉ. सोलंकी यांनी त्वरित डॉ. मनीष मेश्राम यांना रुग्णालयात पाठवून रुग्णावर तातडीने उपचार सुरू केले.
या दौऱ्यात डॉ. नेते यांनी गडचिरोलीत सुरू झालेल्या मेडिकल कॉलेजबद्दलही आपले मत व्यक्त केले. “आपण गडचिरोलीत मेडिकल कॉलेज आणले आहे. हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून, आपल्या जिल्ह्याला आरोग्याच्या दृष्टीने मजबूत बनवणारं केंद्र आहे,” असे ते म्हणाले. यापुढे रुग्णालयातील सेवांचा आणि मेडिकल कॉलेजशी संबंधित डॉक्टरांच्या भूमिकेचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.



