
राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचा समारोप
गडचिरोली : साहित्य हे सामाजिक परिवर्तनासाठी महत्त्वपूर्ण असून अशा सामाजिक परिवर्तनासाठी साहित्य संमेलनामधून प्रतिभावंत साहित्यिक निर्माण होतील, अशी आशा मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे यांनी व्यक्त केली.
राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष अक्षय चंदेल, विदर्भ साहित्य संघ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ. प्रिया गेडाम, आमंत्रक डॉ. तीर्थराज कापगते, डॉ. श्याम मोहरकर, संमेलनाच्या समन्वयक डॉ. सविता गोविंदवार, विदर्भ साहित्य संघ शाखा गडचिरोलीचे शाखाध्यक्ष डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. विवेक अलोणे, अभिजीत इंगळे, सत्यपालसिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
खंडारे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच नवनवीन उपक्रम राबवीत असते. त्याचाच एक भाग म्हणून गोंडवाना विद्यापीठाने या दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन केले. या संमेलनामधून निश्चितच युवा पिढी प्रेरीत होऊन साहित्य क्षेत्रामध्ये नवनिर्मिती करतील.
प्रदीप दाते म्हणाले, या संमेलनामधून मांडण्यात आलेले विचार येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल. संमेलनातील विविध सत्रे फारच उपयोगी होती. या संमेलनामधून स्थानिक नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे.
यावेळी डॉ. तीर्थराज कापगते यांनी ठरावांचे वाचन केले तर संमेलनाध्यक्ष अक्षय चंदेल, अभिजीत इंगळे, सत्यपालसिंग राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रलय म्हशाखेत्री यांनी केले तर आभार डॉ. सविता गोविंदवार यांनी मानले. सदर संमेलनासाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांचे मार्गदर्शन लाभले.

संमेलनामध्ये दिवसभरामध्ये अभिजात मराठी आणि बोलीभाषा (परिसंवाद), विद्यार्थ्यांचे कविसंमेलन, पर्यावरण जागृती, गझल मुशायरा, स्वरांगण (विजया कांबळे यांचे सरोदवान) ही सत्रे पार पडली. यावेळी डॉ. हेमराज निखाडे, डॉ. नीळकंठ नरवाडे, अमोल चव्हाण, डॉ. राम वासेकर, डॉ. विलास खुणे, प्रा. प्रदीप चापले यांच्यासह साहित्यप्रेमी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



