जादूटोण्याच्या संशयावरून जमावाने इसमाला केली बेदम मारहाण

चिंचोली येथील घटना ; २१ नागरिकांवर गुन्हा दाखल
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील चिंचोली येथील देवराव बाजीराव आडे (५५) यांना जादूटोण्याच्या संशयावरून गावातील चावडीवर असलेल्या सभेतच गावकऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात २१ नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे गावातील वातावरण चांगलेच तापले आहे.
कोरपना तालुक्यातील आदिवासीबहुल चिचोली गावातील देवराव आडे यांच्यावर गावकऱ्यांचा जादूटोणा करतो, अशा संशय होता. मात्र आडे परिवारांनी याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, मागील १५ दिवसांपासून गावातील विनोद जुमनाके हा व्यक्ती माझ्या बहिणीवर जादूटोणा केल्याचा आरोप करीत होता. १ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास २० ते २५ संख्येत असलेल्या महिला, पुरूषांनी देवराव आडे यांच्या घरावर हल्लाबोल केला. यामुळे गाव पाटील वसंत जुमनाके यांनी चौकात गावकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलाविली. या बैठकीत पंचाच्या समक्ष त्यांना विचारणा झाली. यावेळी या आरोपाचे स्पष्टीकरण देताना गावकऱ्यांनी लाठ्या, काठ्यांनी देवराव आडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात ते जखमी झाल्याने गावकऱ्यांच्या तावडीतून सुटका करीत ते गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. याप्रकरणी गडचांदूर पोलिसांत तक्रार करण्यात आली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गडचांदूरचे ठाणेदार कदम यांनी विनोद जुमनाके, वसंत जुमनाके, हनू पेंदोर, रामू सोयाम, दादाजी पेंदोर, राजू तुळासे, धर्मा जुमनाके, गंभीरराव जुमनाके, अक्षय सलाम, वासुदेव कुळमेथे, गुलाब सिडाम, मिथून आडे, गंगू कुसनाके, शंकर कुसनाके उमराव जुमनाके जानका जुमनाके, यशोदा जुमनाके, शारदा आळे, अरुणा सलाम, बिजला कोटनाके कौशल्या पेंदोर यांच्यावर संहिता महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व जादूटोना प्रतिबंध कायद्यांतर्गत बीएनएस २०२३ अन्वये ११८/१, १८९/२, १८९/४, १९१/२, १९० नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरण गंभीर असल्याने गावातील वातावरण तापलेले असून, पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनात गडचांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम करीत आहे.



