गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

‘पोलीस दादालोरा खिडकी’अंतर्गत आदिवासी बांधवांना विविध साहित्याचे वाटप

अपर पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम ; विद्यार्थ्यांचा गौरव

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ या उपक्रमांतर्गत शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधव आणि विद्यार्थ्यांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरिंग दोरजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम एकलव्य हॉल येथे पार पडला.

या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागांमधून आलेल्या ३०० हून अधिक नागरिक आणि विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते साहित्य देण्यात आले. यामध्ये ५ शिलाई मशीन, १० स्मोकलेस चुल्हे, १० स्प्रे पंप, २८ प्रशिक्षणार्थींना दुचाकी दुरुस्ती किट, ६१ शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. यासोबतच, सन २०२४ मध्ये झालेल्या वीर बाबूराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धेतील २३,९३५ सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

अपर पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “पोलीस आणि नागरिकांच्या समन्वयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद कमी होत आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. तसेच, ग्रामीण भागात राहत असल्याबद्दल कोणताही कमीपणा न बाळगता उच्च शिक्षण आणि चांगल्या भविष्यासाठी प्रयत्न करत राहण्याचे आवाहन केले. “पोलीस दल नेहमीच नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे,” असेही ते म्हणाले.

‘पोलीस दादालोरा खिडकी’ अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली. ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमातून आतापर्यंत १३,९९७ युवक-युवतींना रोजगार प्रशिक्षण, ७३७ शेतकऱ्यांना कृषी सहली, १२४० नागरिकांची नेत्र शस्त्रक्रिया आणि ७१ सार्वजनिक वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. तसेच, ३,५७८ विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपरसारखे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे आतापर्यंत १०,७३,९०५ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला आहे.

यासोबतच अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरिंग दोरजे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस कवायत मैदान येथिल व्हॉलीबॉल व बास्केटबॉल मैदानाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना कर्तव्यासोबतच आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी या मैदानांचा फायदा होणार आहे.

कार्यक्रमप्रसंगी पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच सहायक पोलीस अधीक्षक, धानोरा अनिकेत हिरडे व पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि, चंद्रकांत शेळके व सर्व अंमलदार तसेच पोलीस मुख्यालयाच्या अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button