एसटीचे ब्रेक फेल ; बसस्थानकात तिघांना धडक

शिवसेनेच्या युवा नेत्यांनी दाखवली तत्परता, जखमींना तातडीने रुग्णालयात केले दाखल
गडचिरोली : शहरातील बसस्थानकात रविवारी दुपारी अडीच वाजता एक मोठा अपघात होता होता टळला. आरमोरी-देलोडा मार्गावर जाण्यासाठी तयार असलेली एसटी बस फलाटावर लावत असताना अचानक तिचे ब्रेक फेल झाले. बस थेट प्रवाशांच्या गर्दीत घुसली आणि या अपघातात तीन जण जखमी झाले.
या अपघातात विहीरगाव येथील निर्मला शंकर बाबनवाडे (वय ५२) आणि तीन वर्षांचा अवीत अंकुश बाबनवाडे तसेच चांभार्डा येथील तृप्ती प्रमोद चणेकार (वय १४) हे जखमी झाले. सुदैवाने, तिघांनाही किरकोळ जखमा झाल्या. घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उबाठा गट) चे युवा नेते पवन गेडाम, तालुकाप्रमुख कुणाल कोळे आणि शहरप्रमुख पप्पू शेख तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कोणतीही वेळ न दवडता आपल्या खासगी वाहनाने जखमींना सामान्य रुग्णालयात हलवले. रुग्णालयात डॉ. देशक सहारे यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. तिघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे.
अपघातानंतर पोलिसांनी बसचालक बंडू खांडरे (वय ५६) यांना ताब्यात घेतले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. अपघाताच्या वेळी डेपो प्रबंधक उशिरा पोहोचल्याने काहीसा संताप व्यक्त झाला. मात्र, युवा नेत्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली, असे नागरिकांनी सांगितले.



