नागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नागपूर विभागातील रुग्णांना १३.८१ कोटींची मदत

सात महिन्यांत १५८२ रुग्णांना लाभ ; ‘पेपरलेस‘ प्रणालीमुळे गरजूंपर्यंत वेळेत मदत

मुंबई : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष एक मोठा आधार बनला आहे. नागपूर विभागात गेल्या सात महिन्यांत (१ जानेवारी ते ३१ जुलै २०२५) तब्बल १५८२ रुग्णांना १३ कोटी ८१ लाख २० हजार रुपयांची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, आता अर्ज प्रक्रिया पेपरलेस आणि डिजिटल करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना मदतीसाठी मंत्रालयात येण्याची गरज राहिलेली नाही. अर्जदारांनी प्रथम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत किंवा इतर योजनांचा लाभ घ्यावा. त्यानंतर, या योजनांमधून उपचार शक्य नसल्यास, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमधून अर्ज करता येतो. यामुळे सरकारी योजनांचा वापर होतो आणि निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचतो.

नागपूर विभागातील मदतीचा तपशील (१ जानेवारी ते ३१ जुलै २०२५)

जिल्हा रुग्णसंख्या मदत रक्कम
नागपूर १३९६ १२,१६,८२,०००
वर्धा ४१ ३९,५५,०००
भंडारा ३१ २९,३५,०००
गोंदिया ५० ३९,००,०००
चंद्रपूर ५४ ४७,४८,०००
गडचिरोली ९ ९,००,०००

२० गंभीर आजारांसाठी ही मदत दिली जाते, ज्यात कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग (शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन), रस्ते अपघात, बालकांच्या शस्त्रक्रिया, हिप व गुडघा रिप्लेसमेंट, मेंदूचे आजार,डायालिसिस, अस्थिबंधन, बर्न/विद्युत अपघातग्रस्त रुग्ण, नवजात शिशुंचे आजार रुग्णांचा समावेश आहे. मदतीसाठी आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय अहवाल इ.) PDF स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या ईमेलवर पाठवण्याचे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 9321 103 103 वर संपर्क साधता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button