गडचिरोलीविदर्भ

झेंडेपार लोह प्रकल्पाला ग्रामस्थ व सरपंच संघटनेचा तीव्र विरोध

‘पेसा‘ कायद्याचे उल्लंघन आणि पर्यावरणाची हानी होणार असल्याचा आरोप ; ग्रामसभेशिवाय काम सुरू केल्याने संताप

कोरची : तालुक्यातील झेंडेपार येथे खासगी कंपनीकडून सुरू करण्यात येत असलेल्या लोह प्रकल्पाला ग्रामस्थ, सरपंच संघटना आणि पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होणार असून, शेतीही बाधित होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे, झेंडेपार हे गाव ‘पेसा’ कायद्यांतर्गत येत असूनही ग्रामसभेचा सल्ला किंवा मंजुरी न घेता काम सुरू करण्यात आल्याचा आरोप सरपंच संघटनेने केला आहे.

येथील बिरसा मुंडा गोटुल भवनमध्ये १ जून रोजी सरपंच संघटनेकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत सरपंच संघटनेचे विदर्भ अध्यक्ष संदीप ठाकूर आणि कोरची तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘पेसा’ कायद्यांतर्गत झेंडेपार ग्रामसभेला स्थानिक संसाधनांच्या वापराबाबत अंतिम निर्णयाचा अधिकार आहे. मात्र, स्थानिक ग्रामसभेचा आरोप आहे की, त्यांना विश्वासात न घेता खासगी कंपनीने थेट प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. कोरची तालुक्यातील सर्व सरपंचांनी एकत्र येत प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हा प्रकल्प तत्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच संघटनेने दिला आहे.

झेंडेपार परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे असून, लोह प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे जैवविविधतेवर गंभीर परिणाम होणार आहे. याशिवाय, शेतीची जमीन बंजर होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांचे मुख्य जीवनमान शेतीवर अवलंबून असल्याने, हा प्रकल्प त्यांच्या उपजीविकेलाच धोका निर्माण करतो असे आंदोलकांचे म्हणणे आहे. या पत्रकार परिषदेला सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष धनिराम हिडामी, सरपंच रमेश तुलावी, छाया बोगा, कौशल्या काटेंगे, इंदल कुमरे, किशोर नरोटे, मोहन कुमरे, चेतन किरसान व अनेक सरपंच तसेच उपसरपंच उपस्थित होते.

सध्या कोरची तालुक्यात असंतोषाचे वातावरण असून, पर्यावरण रक्षण, शेतीचे भविष्य आणि स्थानिक हक्क यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button