
दोन तरुणींची सुटका, तीन आरोपींना अटक ; ६.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : हिंगणा मार्गावरील वासुदेवनगर मेट्रो स्थानकाजवळ असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी राजेंद्र नगर ले-आउटमधील ओयो अर्बन रिट्रीट या हॉटेलवर लक्ष ठेवले. पोलिसांनी एक डमी ग्राहक हॉटेलमध्ये पाठवला. त्याने इशारा दिल्यावर सोमवारी सायंकाळी पथकाने हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी तेथे देहव्यापार सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन तरुणींची सुटका केली. त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हे कृत्य करवून घेतले जात होते.
पोलिसांनी या प्रकरणी जयश्री संतोष सोळंकी (३८), सलमान ऊर्फ रोशन राजेश डोंगरे (३६), अक्षय रोशन रामटेके (३२) या तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी रजत राजेश डोंगरे फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपींकडून ६.३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल शिरे, शिवाजी ननवरे, किशोर ठाकरे, शेषराव राऊत, समीर शेख, अश्विन मांगे, कुणाल मसराम, नितीन वासने, आरती चौहान, पूनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



