गोंदियाविदर्भ

विकसीत भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची गाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा – जिल्हाधिकारी प्रजित नायर

मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन ; नागरिकांनी प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन

गोंदिया : विकसीत भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन व गरीब कल्याणाची 11 वर्ष आणि स्वातंत्र्याची अमृत गाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गरजू नागरिकांना मिळवून देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. शासनाने केलेल्या उल्लेखनीय कामाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि जिल्हा प्रशासन गोंदिया, जिल्हा परिषद गोंदिया व जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता.13) नविन प्रशासकीय इमारत गोंदिया येथे विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष आणि स्वातंत्र्याची अमृत गाथा, हर घर तिरंगा या विषयावरील मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

मंचावर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, तहसिलदार शमशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होते.

जिल्हाधिकारी नायर पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरीकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य प्रशासनामार्फत केले जाते. मागील 11 वर्षात प्रशासनामार्फत लोक कल्याणासाठी करण्यात आलेले कार्य व शौर्यगाथा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व गरजूंना योजनेचे लाभ देणे बाबत प्रशासकीय यंत्रणेने काटेकोरपणे कार्यवाही करून जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचवावी, तसेच नागरीकांनी सदर प्रदर्शनाला भेट देऊन विविध शासकीय योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पोलीस अधीक्षक भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, प्रशासन म्हणून नागरिकांची सेवा व विविध समस्यांचे समाधान करणे, ही आपली जबाबदारी आहे. पुढील दोन दिवस ही प्रदर्शनी चालणार असून नागरीकांनी सदर प्रदर्शनाला भेट देऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी.

सदर प्रदर्शनी 13 ते 15 ऑगस्ट 2025 पर्यंत सुरु राहणार असून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. सर्वांना प्रवेश नि:शुल्क असून नागरिकांनी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले. सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक कैलाश गजभिये, केंद्रीय संचार ब्युरो नागपूरचे तांत्रिक सहायक संजय तिवारी, एमटीएस नरेश गच्छकायला कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button