
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दाखवली हिरवी झेंडी ; ३५० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे १३ ते १८ ऑगस्ट या कालावधीत ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम’ राबवली जात आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून गुरुवारी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय (कारंजा) येथून एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक भामरे यांनी हिरवी झेंडी दाखवून या बाईक रॅलीची सुरुवात केली. या रॅलीमध्ये सुमारे ३०० ते ३५० पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते. पोलीस मुख्यालय, गोंदिया येथून निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवरून फिरली. यामध्ये जयस्तंभ चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नेहरू चौक, गांधी चौक यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणांचा समावेश होता. या रॅलीचा मुख्य उद्देश समाजाला अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करणे आणि नशामुक्त समाज घडवण्याचे आवाहन करणे हा होता. रॅलीचा समारोप वाहतूक शाखा, गोंदिया येथे करण्यात आला.
या यशस्वी रॅलीचे नियोजन उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, नागेश भाष्कर, रा.पो.नी. राजेश सरोदे, नक्षल सेलचे पो.उप. निरीक्षक श्रीकांत हत्तीमारे यांनी केले.



