
शहरातील कुंभारेनगर परिसरात पोलिसांची कारवाई ; आरोपींकडून घातक शस्त्रे जप्त
गोंदिया : गोंदिया शहर पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना रंगेहाथ पकडले आहे. शहरातील कुंभारेनगर परिसरात आंबेडकर भवनजवळ १४ आणि १५ ऑगस्टच्या मध्यरात्री पोलिसांनी ही धाडसी कारवाई केली. आरोपींकडून घातक शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिस पथक मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना त्यांना कुंभारेनगर परिसरात काही संशयास्पद व्यक्ती अंधारात फिरताना दिसल्या. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना पकडले. यात घनश्याम ऊर्फ गोलू अशोक चौधरी (वय २२, रा. माताटोली) आणि मित्तल मुनेश्वर तुपटे (वय २०, रा. पैकनटोली) यांचा समावेश आहे. मात्र, त्यांचे काही साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.
आरोपी घनश्याम चौधरी हा घरफोडीच्या गुन्ह्यात आधीच दोषी ठरलेला असून, २०२३ मध्ये त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर असताना पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक लोखंडी तलवार, लोखंडी कोयता, रॉड, दोन मोबाईल, १०० ग्रॅम मिरची पावडर आणि एक टॉर्च असा एकूण ६,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केदार घाडगे करत आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयाने १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार झालेल्या इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, उपनिरीक्षक घाडगे, सहायक फौजदार घनश्याम थेर, हवालदार कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, सतीश शेंडे, दीपक रहांगडाले, शहारे, शिपाई दिनेश बिसेन, अजय बोपचे, प्रकाश गभने, नीलेश बाळणे, रोहित रामटेके, मनोज केवट, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, अशोक रहांगडाले, प्रमोद शेंडे यांनी केली.



