२५ ऑगस्टला कंत्राटदारांचे ‘भिकमांगो’ आंदोलन : थकीत देयकांसाठी विदर्भातील कंत्राटदार आक्रमक

गडचिरोलीत बैठक, नागपुरात मुख्य अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय
गडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थकीत देयके मिळत नसल्याने विदर्भातील कंत्राटदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गडचिरोली येथे झालेल्या विदर्भ कंत्राटदार संघटनेच्या बैठकीत थकीत बिलांसाठी नागपूर येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर २५ ऑगस्ट रोजी ११ वाजता ‘भिकमांगो’ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष नितीन डहाके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यवतमाळचे प्रवीण उंबरकर, वर्धा येथील किशोर मिटकरी, विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अजय तुम्मावार, भूषण समर्थ, मंगेश देशमुख, प्रणय खुणे, मनोज पवार, राहुल निलमवार, सागर निंबाळकर, रणछोड कलंत्री, लिलाधर भरडकर, निलकंठ गावंडे, हुड्डा, प्रसाद कवास उपस्थित होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून विविध योजनांची देयके प्रलंबित असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. मार्च २०२५ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ ५% निधी वितरित केला होता, त्यानंतर कोणताही निधी मिळालेला नाही. सरकारने १० दिवसांत प्रलंबित देयकांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. मागील देयके पूर्णपणे अदा केल्याशिवाय नवीन निविदा काढू नयेत. या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात गडचिरोलीसह नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, गोंदिया, भंडारा, अमरावती, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमधील कंत्राटदार सहभागी होणार आहेत.



