गडचिरोलीविदर्भ

हत्तींच्या समस्येवर ‘ट्रैंकुलाइज’ उपायाची चाचपणी ; कायमस्वरूपी तोडग्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

पिक नुकसानीची पाहणी, बाधितांना दिला दिलासा

गडचिरोली : जिल्ह्यात जंगली हत्तींमुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीवर आणि जीवितहानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गंभीरपणे प्रयत्न करत आहे. यासाठी हत्तींना ट्रैंकुलाइज करून त्यांच्या हालचाली नियंत्रित करण्याबाबत देहरादून येथील ‘वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट’शी संपर्क साधण्यात येईल, अशी माहिती जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिली. तसेच हा प्रश्न मुख्यमंत्री यांच्या समक्ष मांडून शास्त्रोक्त उपाययोजना करण्याचा प्रयत्न होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सहपालकमंत्री जयस्वाल यांनी बुधवारी गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा, पिपरटोला-धुंडेशिवणी आणि दिभणा या गावांमध्ये हत्तींमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच, ठाणेगाव येथील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या १२८ हेक्टर शेतीची माहिती घेतली. त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले. यासोबतच, १० सप्टेंबर रोजी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चुरचुरा येथील वामन गेडाम यांच्या कुटुंबीयांना त्यांनी १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. शासनाकडून त्यांना एकूण २५ लाख रुपयांची मदत जाहीर असून, ती टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे.

गावकऱ्यांशी संवाद साधताना नागरिकांनी हत्ती गावात येऊ नयेत अशी उपाययोजना करण्याची मागणी, तसेच नुकसानीची मदत तमिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी व विविध तक्रारी मांडल्या. यावर सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी वनविभागाने संवेदनशीलतेने बाधितांना वेळीच मदत द्यावी, तसेच शासन लवकरच ५० हजार रुपये प्रति एकर मदतीचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेऊन समस्या सोडविण्याची हमीही दिली.

पिपरटोला-धुंडेशिवणी येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत सहपालकमंत्री जयस्वाल यांनी वाघ व हत्तींची समस्या, नुकसानभरपाईची कमी मिळणारी रक्कम, वनपट्टे, तसेच पाणंद रस्ते या गंभीर प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन जिल्हावासीयांना दिलासा दिला जाईल, असे आश्वासन दिले.

या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, उपवनसंरक्षक बी. वरूण, उपविभागीय अधिकारी रणजित यादव व अनुष्का शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तहसीलदार उषा चौधरी, तसेच राकेश बेलसरे, चंद्रशेखर भडांगे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button