
नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील ठाणा येथील घटना; १७ वर्षीय भाचा गंभीर जखमी, राजस्थानच्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या एका नादुरुस्त ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा थरारक आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात २२ ते २३ मे च्या मध्यरात्रीच्या सुमारास ठाणा उड्डाणपुलावर (फ्लायओव्हर) घडला. या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये नागपूरच्या एकाच कुटुंबातील मामाचा समावेश असून, त्यांचा सतरा वर्षीय भाचा मृत्यूशी झुंज देत आहे.
रंजीत दामोदर येरणे (वय ३१, रा. केसोरी, कामठी, नागपूर) आणि सुनील गौरव (वय ३५, रा. मानकापूर, नागपूर) अशी जागीच ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर वेदांत प्रवीण धांडे (वय १७, रा. मानकापूर, नागपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. मृत रंजीत येरणे आणि जखमी वेदांत धांडे हे नात्याने मामा-भाचे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रंजीत येरणे आणि त्याचा भाचा वेदांत धांडे हे दोघे आपल्या ट्रकमध्ये (क्रमांक CG 07 / CA 3400) माल भरून राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरहून रायपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास जवाहरनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ठाणा पेट्रोल पंप उड्डाणपुलावर त्यांच्या ट्रकच्या उजव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यामुळे त्यांनी आपला ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. टायर बदलण्यासाठी रंजीत यांनी त्यांचे ओळखीचे दुसऱ्या ट्रकचे चालक सुनील गौरव यांना मदतीसाठी बोलावून घेतले. मामा रंजीत, भाचा वेदांत आणि चालक सुनील हे तिघेही ट्रकचे टायर बदलण्याच्या कामात व्यस्त होते. हे तिघे टायर बदलत असतानाच, नागपूरहून रायपूरच्याच दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने (क्रमांक OD 02-AH 3325) रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून अत्यंत जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकच्या चाकाजवळ काम करणारे रंजीत येरणे आणि सुनील गौरव हे दोघेही वेगवेगळ्या बाजूला फेकले गेले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाजूला उभा असलेला १७ वर्षीय वेदांत धांडे गंभीररीत्या जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी वेदांत धांडे याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
याप्रकरणी निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल धडक देणाऱ्या ट्रकचा चालक रामप्रसाद गोपाल जाट (वय ४०, रा. उमेदपूर, भिलवाडा, राजस्थान) याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०६ (१), २८१, १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रदीप चुटे करत आहेत.



