गडचिरोलीविदर्भ

खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण व धान पिकाची रोवणी ; राष्ट्रीय महामार्गाच्या दयनीय अवस्थेविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे नागरिक संतप्त ; १० दिवसांत खड्डे बुजविण्याची मागणी

गडचिरोली : आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी च्या दयनीय अवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी जिमलगट्टा फाटा येथे प्रशासनाचा निषेध करत एक आगळेवेगळे आंदोलन केले. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे  प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त नागरिकांनी थेट वृक्षारोपण आणि धान पिकाची रोवणी करून आपला संताप व्यक्त केला.

या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केले. गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गाची दुर्दशा झाली असून, यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खराब रस्त्यांमुळे प्रवाशांना वेळ आणि इंधनाचा मोठा अपव्यय सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे येत्या १० दिवसांत जीएसबी (Granular Sub-base) टाकून त्वरित भरण्यात यावेत. रखडलेले महामार्गाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे. या दोन प्रमुख मागण्या आंदोलकांनी प्रशासनाकडे केल्या. यावेळी ‘निषेध, निषेध, निषेध’ अशा जोरदार घोषणा देत नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले, तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

या आंदोलनात सालाया कंबलवार, राजू मामीडवार, यशवंत डोंगरे, स्नेहदीप आत्राम, शंकर रंगूवार, अरुण वेलादी, शंकर नैताम, डॉ. साईश उपग्नलावार, नंदेश्वर मेश्राम, शैलेश कोडापे, महेश बोरकुट, ज्योती मडावी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button