
गोंदिया : हावडा ते मुंबईकडे जाणाऱ्या मेल एक्सप्रेसमधून खाली पडून एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. १६) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली आहे. मिजानूर रहमान अब्दुल रहमान (रा. दवलतपूर, पश्चिम बंगाल) असे मृत मुलाचे नाव आहे.
मिजानूर रहमान हा त्याच्या सहकाऱ्यासोबत हावडा-मुंबई मेल गाडीच्या एसीएम-१ कोचमधून प्रवास करत होता. गाडी सोनारटोला गेटजवळ असताना, तो अचानक दिसेनासा झाला. “कोणी पडला, कोणी पडला” असा आरडाओरड झाल्याने प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली. गाडी थांबल्यावर तपासणी केली असता, मिजानूर रहमान रुळाजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. घटनास्थळ सोनारटोला गेटजवळील पोल क्रमांक ९६६/१७-१९ जवळील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्टेशन अधीक्षकांच्या मेमोनंतर सालेकसा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस हवालदार खुशरंग बिसेन पुढील तपास करत आहेत.



