गोंदियाविदर्भ

खरीप हंगामात पाण्याचे योग्य नियोजन करा – पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचे प्रशासनाला निर्देश

बियाणांचा तुटवडा व खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई ; ७१ हजार शेतकऱ्यांनी डाऊनलोड केले ‘महा विस्तार‘ ॲप

गोंदिया : यावर्षीच्या अंदाजित पर्जन्यमानानुसार पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने, खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप पूर्व आढावा बैठकीत ते दूरदृश्य प्रणालीच्या (Video Conferencing) माध्यमातून बोलत होते.

वर्ष २०२६-२७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात भात, तूर, तीळ, मका, हरभरा, जवस, मोहरी आणि भाजीपाला या पिकांची २०,३२०९ हेक्टर जमिनीवर पेरणी प्रस्तावित आहे. यासाठी प्रशासनाने बियाणे आणि खतांचे चोख नियोजन करावे, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बियाणे उपलब्धता: खरीप हंगामासाठी ५६,९४६ क्विंटल बियाण्यांची गरज असून, शेतकऱ्यांना ते निर्धारित दरात उपलब्ध होतील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. लिंकिंगला नकार: युरिया किंवा डीएपी खतांसोबत इतर औषधे किंवा खते घेण्याची सक्ती (लिंकिंग) केली जात असल्यास शेतकऱ्यांनी स्पष्ट नकार देऊन शासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन नाईक यांनी केले. काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. नॅनो युरिया: जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी नॅनो युरियाचा वापर करण्याबाबत कृषी विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जनजागृती करावी.

बैठकीत माहिती देण्यात आली की, वर्ष २०२५ मध्ये जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत ३८.४१ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. तसेच, जिल्ह्यातील ७१,८०४ शेतकऱ्यांनी राज्य शासनाचे ‘महा विस्तार’ ॲप डाऊनलोड केले असून, याद्वारे त्यांना पेरणी तंत्रज्ञान, मृदा आरोग्य आणि पीक संरक्षणाची डिजिटल माहिती मिळत आहे.

पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे मागील वर्षीचे धानाचे प्रलंबित पैसे लवकरात लवकर देण्याचे आदेश दिले. तसेच, १ मे पासून मका खरेदी केंद्रे सुरू होऊनही जिथे खरेदी सुरू झाली नाही, तिथे तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, खासदार नामदेव किरसान, आमदार विनोद अग्रवाल, संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुग्णांथम आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button