क्राईमगोंदियाविदर्भ

महिलेची हत्या करून तिच्या सात महिन्यांच्या बाळाची केली विक्री

१९ दिवसांनंतर खूनाचे गूढ उकलले ; सात आरोपींना अटक

गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील खजरी शेतशिवारात सापडलेल्या एका अनोळखी महिलेच्या खून प्रकरणाचा थरारक उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) केला आहे. पोलिसांनी केवळ खूनाचाच नव्हे, तर मृत महिलेच्या सात महिन्यांच्या बाळाची विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचाही पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली असून, १९ दिवसांनंतर या प्रकरणाची उकल झाली आहे.

३ ऑगस्ट रोजी खजरी शेतशिवारात एका २०-२५ वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा मृतदेह आढळला होता. यानंतर डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख पटली. ती छत्तीसगडमधील भिलाई येथील अन्नु नरेश ठाकूर (वय २१, रा. भिलाई, दुर्ग, छत्तीसगड) असल्याची माहिती समोर आली.

मुख्य आरोपी अभिषेक सिद्धार्थ तुरकर (वय ३६, रा. भिलाई, ह.मु. डोंगरुटोला गोरेगाव, जि. गोंदिया) याचे अन्नुसोबत अनैतिक संबंध होते. कर्जामुळे आर्थिक अडचणीत आल्याने अभिषेकने आपली पत्नी पूनम तुरकर, नातेवाईक प्रिया तुरकर आणि साथीदार चांदणी (रा. नेहरू नगर, भिलाई) यांच्या मदतीने अन्नुच्या खूनाचा कट रचला. २ ऑगस्ट रोजी अभिषेकने अन्नुला खजरी शेतशिवारात नेऊन तिची हत्या केली. हत्त्या केल्यानंतर आरोपींनी अन्नुच्या सात महिन्यांच्या मुलगा धनराज याचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार केले आणि त्याची विक्री केली. या विक्रीमध्ये सुरेखा रमेश चव्हाण, प्रीती विकास कडबे, भावेश अशोक बन्सोड आणि कमल सुकलाल यादव यांनी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी अभिषेक सिद्धार्थ तुरकर, पूनम तुरकर, प्रिया तुरकर, सुरेखा रमेश चव्हाण, प्रीती कडबे, भावेश अशोक बन्सोड, कमल यादव या सात आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी डुग्गीपार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button